Thursday, June 23, 2011

सात समुद्र ओलांडून ! --- आकाशानंद


‘मराठी’ हा शब्द उच्चारताच आपल्या दृष्टीपुढे कितीबरी गोष्टी उभ्या राहतात! महाराष्ट्र भूमी, मराठी माणसं, मराठी माणसाची मराठी मन, मराठी माणसाची संस्कृती, संत कवी, लेखक, नाटककार, अभिनेते, क्रिकेटपटू, चित्रकार, कुस्तीवीर, मराठी मातेच्या कीर्तीमान सुकन्या. पण आज आपण केवळ ‘मराठी’ भाषेचाच-ओजस्वी भाषेचा विचार केलातरी अभ्यास संशोधनानंतर कळतं की, अनेक विचारवंतांनी आपल्याला मराठी भाषेला आपल्या मनातील विचारसौंदर्य बहाल केलं आहे. आद्य कवी मुकुंदराज, आद्य नाटककार विष्णुदास भावे, आद्य कांदबरीकार बाबा पद्मनजी, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत अशी नुसती ‘आद्याची’ नामावली सुद्धा दहा पृष्ठांची होऊ शकेल.

एक गोष्ट मात्र खरी मराठी माणसाने मराठी भाषेवर नितांत अकृत्रिम प्रेम करावे. सानेगुरुजी म्हणतात की, संत ज्ञानेश्वरांनी ‘स्त्री शुद्ध प्रतिभेत सामावले ’ असा विचार ज्ञानेश्वरीत प्रगट करुन मराठी माणसाचा मोठेपणाच सिद्ध केला आहे. या मराठी माणसाला ‘ज्ञानाच्या भाकरी सोबत विचारांचा ठेवाही लागतो’ असंही साने गुरुजी पुढे म्हणतात. मराठीतला सर्व श्रेष्ठ विचार कोणता? तर डॉ. अरुण टिकेकर म्हणतात, ‘संत ज्ञानेश्वरांची अजरामर रचना म्हणजे ‘पसाय-दान’ हा मराठीचा बहुमोल ठेवा आहे. तो जतन करायलाच हवा.’ ते म्हणतात, ‘सर्व जगात बिनतोड असा हा विचार आहे. पसायनदाना सारखा विचार जागतिक वाड्‍ःमयात क्वचित कोठे आढळेल, पसायनदानातील विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेला जगात कोठे ही तोड नसेल!’ साने गुरुजींनी तरी ‘समस्ता बंधू मानावे कारण प्रभुची लेकरे सारी’ असंच नाही का म्हटल? पण या समस्तामध्ये जनी जनार्दन शोधण्याची प्रक्रियाही अंतर्भूत होते असं छत्रपती शाहू महाराजाचं म्हणणं आहे ‘मराठीचा धर्म कोणता?
देशबंधूंची सेवा करणे,
जनी जनार्दन शोधणे,
आणि जनी जनार्दन पाहणे!‘

गोपाळ गणेश आगरकर तरी दुसरं काय म्हणतात? त्यांच्या मते रामदासांनी आपल्याला दिलेली शिकवण ‘शहाणे करुन सोडावे सकळजन’ ही अत्यंत महत्वाची आहे. ‘देश समर्थ, शक्तिशाली व्हावा म्हणून, लोकांची मने कार्य प्रवण व्हावीत म्हणून सर्वांनी स्वीकारावे एकमेव ब्रीद ‘शहाणे करुन सोडावे सकळ जन! केवळ ज्ञानेश्वर, रामदासांनीच नव्हे तर सगळ्याच मराठी संतांनी असाच संदेश दिला आहे. जीवनरहस्यकार विमलाताई ठकार म्हणतात - ‘संतांनी महत्त्व सांगितले, निर्हेतुकाची कला शिकविली, निरागस अवधानाची, समर्पण वृत्ती, कोमलता, सहजता, शालीनता अंगी बाळ्गून शिकवण दिली माणुसकीची! पण आम्ही काय करतो? संत काव्य फक्त वाचतो. त्यांची शिकवण स्वतःच्या अंगी बाणवायची आहे हे विसरतो?" अशी तक्रार आहे - ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांची - ‘संत साहित्य नुसते वाचू नका. ते प्रत्यक्ष कृतीत आणा, संतांची आज्ञा पाळणे हाच असावा मराठी माणसाचा बाणा!’

त्यांनी ‘मनाचे श्लोक’ हे रामदासास्वामींच्या अजोड साहित्यानिर्मितीच प्रतीक आहे असं म्हटलं आहे.

‘मनाचा प्रत्येक श्लोक
प्रमार्थाने भरलेला आहे,
रामदासांनी तो लिहून
आम्हाला उपकृत केलेल आहे?

डॉ. आंबेडकरांच तर ग्रंथावर खूप प्रेम, त्यांचं संपूर्ण ‘राजगृह’ म्हणजे ग्रंथालय, त्यांना ग्रंथ आपले ‘स्नेही सोबती’ वाटत. मराठी म्हणजे माय माऊली - अगदी पोटाशी धरणारी वाटत असे. ‘समाजाने मला बहिष्कृत केले, थोर ग्रंथानी मला पोटाशी घेतले! त्यांच्या सारखा जगात स्नेही नाही, मातेसारखे मार्गदर्शन यांनीच केले! तर लोकमान्य टिळ्कांन ‘ग्रंथ हेच गुरु’ वाटत. ते म्हणत, ‘मी चांगल्या ग्रंथांच्या घेरावात असेन तर त्यापुढे स्वर्गप्राप्ती सुद्धा तुच्छ आहे. मी चांगल्या ग्रंथांच्या घेरावात असेन तर स्वर्गाचे सुख चालून आले तरी नाकारीन, कारण चांगले ग्रंथ ज्या जागी असतात - तेथे ते प्रत्यक्ष स्वर्गच निर्माण करतात!’
टिळकांच्या मनात मायमराठी बद्दल नितांत श्रद्धा. मराठी जनता म्हणजे कल्पवृक्ष प्रत्यक्ष कामधेनूच! "मला राष्ट्रजागृतीसाठी पैसा’ लागला, निकड जनतेला कळली आणि ‘तो’ मायमराठीने दिला नाही, माझी झोळी भरली नाही असे कधी झाले नाही. मराठी जनता कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे. मला कधीच कमी पडू दिलं नाही."

मराठी लेखकांनी ‘मराठी माणूस’ हा आपल्या लेखनाचा केंद्रबिंदू मानून लिखाण करावं असं वि.स. खांडेकर म्हणतात. ‘माणूस हा साहित्याचा केंद्र बिंदू असावा, मानवता हीच मराठी लेखकाची जात आहे. जीवनात जे जे चांगले होते ते ते त्याने स्वीकारावे. मी केवळ जीवनवादी नसून संस्कारवादी आहे! मराठी लेखकानंकेवल कलात्मक, जीवनवादी लिहून भागत नाही तर त्यांने संस्कारवादीही असावं आणि मी तसाच आहे!’ असं विधान भाऊसाहेबांनी केलं आहे.

संत गाडगेबाबा स्वतः निरक्षर होते पण प्रत्येक ‘मुलांनं शिकलं पाहिजे’ हा त्यांचा आग्रह दरवेळी ते आपल्या रसाळ कीर्तनातून करीत. ‘माणसाणे एक सांजचे उपाशी रहावे, बाईने लुगडे फाडून त्याचे दान करावे, पण आपल्या पोराले अज्ञानी ठेवू नये, त्याने मराठी शाळेमंदी शिकाले पाठवावं!‘ आपल्या मातृभाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असावा आपली मातृभाषा म्हणजे मराठी ती तर आपली आईच. साने गुरुजी म्हणतात - ‘आपल्या मातृभाषेबद्दल मराठी माणसाला अभिमान नाही, पाऊणपट मुले महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात, देश महाभयंकर संकट काळात त्यामुळे सापडला आहे. दारिद्र्याच्या खाईत आपले लोक गटांगळ्या खात आहेत!’

आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी आपली आई, धर्म आपली माता. आपण खरे मातृपूजक आहोत. दुसऱ्याच्या मातेची निंदा करणारे नव्हेत.’ आपली मराठी भाषा किती ओजस्वी, प्रसादपूर्ण , सहजबोध आहे हे यशवंतराव चव्हाण असं समाजातून सांगतात, ‘मराठीत भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची जुळणी पहा कशी आपोआप सहज होऊ लागते. तुम्ही आपल्या भाषेवर अपार प्रेम करावं, नाहीतर तुमची ऐनवेळी वोलताना फजिती होईन!

दुर्गाबाई भागवत म्हणतात, कोणत्याही गोष्टीत मग, ती मराठी भाषा का असेना, प्रभुत्त्व मिळवायचं असेल तर ‘वाया जाऊ नेदी क्षण’ हा विचार मोलाचा आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात ‘आमचा कवी कोणत्याही ‘वर्गाचा’ नसतो. तो फक्त माणसाचे गाणे गात अस्तो! मुलाना वाचनाची गोडी आज अजिबात राहिलेलेई नाही अशी खंत प्रकाशभाई मोहाडीकर, साने गुरुजी कथामालेतून व्यक्त करतात. ‘बालवाड्‍ःमयाच्या प्रसारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी. मुलांना मराठी शिकवून वाचनाची गोडी त्यांना लावावी.’ यदुनाथ थत्ते म्हणतात, ‘बालकुमार युवकांच्या वाचनाला फार महत्त्व आहे’ तर मधु दंडवते म्हणतात, ‘सानेगुरुजींच्या साहित्याला मराठीत फार मान आहे. काही पुस्तकांचे इंग्रजी अनुवादही झाले आहेत. पण मुळ मराठीत असलेल्या पुस्तकांचा अनुवाद आपण एकदा वाचून तरी पहावा असं इंग्रजी वाचकाला वाटतच नाही! विष्णुशास्त्री चिपळूणकर लेखकाच्या स्फूर्तीबद्दल म्हणतात, ‘अंतःकरणाला पीळ पाडणारे घडले म्हणजे लेखणीने लिहायला सुरुवात केलीच पाहिजे!’

ही मराठी माणसाच अंतरंग व्यक्त करणारी मोलाची गोष्ट आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षिका झाल्यानंतर आपल्या महिला विद्यार्थिनीला एकच मोलाच संदेश दिला. ‘भागिनीनो, तुम्ही एकदा का, मराठी लिहायला वाचायला शिकलात तर भाविष्यकाळातलं यश पडेल नक्कीच तुमच्या पदरात!’

आचार्य विनोबांनी देवनागरीचा लिपी म्हणून केवळ मराठीसाठीच नव्हे तर सर्व भारतीय भाषांकरिता उपयोग करावा असा आग्रह धरला आहे. भाषाकोषकार विश्वनाथ नरवणे यांचंही म्हणणं हेच आहे. विनोबा म्हणतात, ‘मराठीच्या लेखकांनी इतर भाषेतील बोधप्रद साहित्य अनुवादित करुन मराठी वाचकांना द्यावे. मराठीचे अवांतर वाचन मुलांनी केल नाही तर त्यांना पुढे फार पश्चात्ताप होईल!’ असाही निष्कर्ष ते काढतात. म. गांधी मातृभाषा हीच शिक्षणाचम माध्यम म्हणून वापरली तर आपण स्वदेशीचा अंगिकार केला असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल असे सांगतात .

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या सार्थ उक्तीनं या लेखनाचा समारोप करु या -

 

‘मराठीची चिंता करण्याची गरज नाही, ग्रामीण भागात ती जागवली जात आहे, शाहीर आणि संत कवींनी हातभार लावला आहे. सात समुद्र ओलांडून

प्रेमाचा ज्वर

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!
भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!
जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!
तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!
"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरीथांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."
ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"
बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!
कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!
अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

Pravin Nikam

Sunday, May 30, 2010

प्रतापगड

नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ झाल्याचे नोंद इतिहासात मिळते. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.

                            ''जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
                             भयाण खिंडी बसल्या पसरुनि 'आ' रानमोळी''

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायर्‍या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.

अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.

असं म्हणतात की, १६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.
प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. ''होता जिवा म्हणून वाचला शिवा'' या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा
http://www.pratapgad.in/marathi/index_marathi.php

Saturday, May 29, 2010

किल्ले कमलगड

वाई हा सातारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. इतिहासकाळापासून प्रसिद्ध असलेल्या वाई तालुक्यामधे सहा किल्ले आहेत. कृष्णेचा काठ लाभलेल्या वाईच्या पश्चिमेला कमळगड नावाचा लहानसा पण समुद्रसपाटीपासून १३७५ मी. उंचीचा किल्ला आहे.

वाई गाव हे पुणे तसेच सातारा शहरापासून गाडीमार्गाने जोडले गेले आहे. पुणे बेंगळुरु मार्गाच्या पश्चिमेला १० कि.मी. अंतरावर वाई आहे. वाई मधूनच पाचगणी आणि महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीमार्ग आहे.

वाईच्या पश्चिमेला धोम धरण आहे. धोम धरण कृष्णा आणि वाळकी नद्याच्या संगमावर बांधले आहे. त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे. या फुगवट्याने कमलगडाला तिन बाजुने विळखा घातला आहे. त्यामुळे कमळगडाला जाण्यासाठी लांबचा वळसा घेवून जावे लागते.

कमळगडाला उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडूनही जाता येते. वाई मधून जोर या गावाला जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावर वयंगाव नावाच्या गावात उतरुन कृष्णा ओलांडून कमळगड गाठता येतो. पण अधिक सोयीचा मार्ग म्हणजे धोम धरणाच्या दक्षिण तीरावरुन जाणारा मार्ग. या मार्गाने मेणवली, खावलीकडून वासोळे गावाला पोहचणे. वासोळे पर्यंत गाडी मार्ग असून एस. टी. ची सेवा ही उपलब्ध आहे.

वाईच्या या पश्चिम भागात सह्याद्रीच्या तीन उपरांगा आहेत. महाबळेश्वर, कोल्हेश्वर आणि रायरेश्वर अशा नावानी या रांगा ओळखल्या जातात.

कोल्हेश्वराच्या दक्षिणेकडे महाबळेश्वर रांग बसून उत्तरेकडे रायरेश्वराची डोंगररांग आहे. कोल्हेश्वराच्या पूर्व टोकाजवळ कमलगडाचा किल्ला आहे. पायथ्याच्या वासोळे गावातून कमलगडाचा पायी मार्ग आहे. मार्गावर पाणी नाही त्यामुळे खालूनच पाणी भरुन घेणे गरजेचे आहे. या मार्गावरचा चढ हा छातीवरचा असल्यामुळे वरच्या पठारावर पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. तासा दिड तासात आपण पठारावर येवून पोहोचतो. येथून डावीकडे कमलगड आहे. डावीकडे वळाल्यावर झाडीचा पट्टा सुरु होतो. येथील एका वहाळाला स्वच्छ पाणी असते.

या झाडीतून आपण पठारावरील धनगराच्या झापाजवळ पोहोचतो. झापाजवळ झाडी तोडून येथे शेती केलेली आहे. झापाच्या मागे काहीशा उंचीचा कमलगडाचा माथा उठावलेला दिसतो. माथ्याच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. माथा उजवीकडे ठेवून वळसा मारल्यावर घळीतून चढून गडावर पोहचता येते.

माथा उघडा बोडका असल्यामुळे आजुबाजूचा सह्याद्री आपल्यासमोर नव्या रुपात उभा ठाकलेला दिसतो. कमलगडावर ऐतिहासिक वास्तूंचा अभावच आहे. पण येथील विहीर मात्र प्रसिद्ध आहे. हिला कावेची विहीर म्हणतात. खोल असलेल्या विहीरीमध्ये उतरण्यासाठी पायर्‍या आहेत.

कमलगडावरुन चंदन, वंदन, नांदगिरी, वैराटगड, पांडवगड, केंजळगड तसेच पाचगणी, महाबळेश्वर आणि रायरेश्वरचे पठार उत्तम दिसते. धोमचा जलाशय आणि वाई परिसरही नजरेत येतो.

सह्याद्रीचे देखणे रुप मनात साठवूनच आपण परतीच्या प्रवासाला निघतो ते सह्याद्रीला एक सलाम करुनच.



 • प्रमोद  मांडे
 • किल्ले भोरगिरी

  पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.

  राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भिमा नदीच्या उत्तरतीरावर वसलेले राजगुरूनगर आजूबाजूच्या महत्वाच्या गावांशी गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडले गेले आहे.

  शिवकालामध्ये मोगलांची सरहद भिमा नदी पर्यंत भिडलेली होती. भिमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भिमा नदीच्या खोर्‍यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.

  भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे. भोरगिरीला जाण्यासाठी राजगुरूनगर वरून एस.टी. बसेसची सोय आहे.

  राजगुरूनगर-भोरगिरी हे साधारण अंतराला दीड एक तास लागतो. या भिमानदीच्या खोर्‍यात चास-कमानचे धरण आहे. या धरणा जवळूनच भोरगिरीचा मार्ग जातो. या खोर्‍यात आपण जसे जसे आत जातो तसा तसा निसर्ग बदलत जातो. पावसाळ्यानंतरच्या कालावधीत खळाळणारे ओढे आणि धबधबे म्हणजे नेत्रसुखाला पर्वणीच असते.

  भोरगिरी गावात पायउतार झाल्यावर प्रथम परतीच्या बसची चौकशी करून घ्यावी. भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंच असला तरी पायथ्यापासून जेमतेम दिडशे मी. उंच आहे. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. डोंगर डावीकडे ठेवून वळता मारूत गडाची वाट जाते. या वाटेने गडावर जाता येते.

  गडावर गडपणाचे अवशेष तुरळक आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. मात्र येथून खाली असलेल्या कोरीव गुहाकडे उतरण्यास वाट नाही. माथ्यावरून थोडे खाली उतरून आडवे चालत आल्यावर या कोरीव गुहापाशी पोहोचता येते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला तासाभराचा अवधी पुरेसा आहे.

  आल्यावाटेने उतरून भोरगिरी गावाजवळ असलेले भिमेचे पात्र गाठावे. या काठावर कोटीश्वराचे मंदिर आहे. मंदिर प्राचीन असल्याचे तेथील अवशेषांवरून दिसते. हा परिसर अतिशय रम्य आहे. येथून राजगुरूनगरला परतता येईल. अथवा दोन तास चालत गेल्यास भिमाशंकरचे मंदिरही पहाता येईल. भिमाशंकर वरूनही घोडेगाव मंचर मार्गे पुन्हा राजगुरूनगरला येता येते.

  प्रमोद  मांडे

  पांडवगड

  सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हा कृष्णा नदीच्या खोर्‍यात वसलेला आहे. कृष्णा नदीच्या उत्तरबाजूस रायरेश्वरापासून निघणारी महादेव रांग आहे. सह्याद्रीच्या या उपरांगेतील एका शृंगावर पांडवगड नावाचा किल्ला बांधलेला आहे.

  समुद्रसपाटीपासून १२७३ मीटरची उंची असलेल्या पांडवगडाला जाण्यासाठी आपल्याला वाईमध्ये दाखल व्हावे लागते. वाई हे पुणे-बंगळूरु या महामार्गाच्या पश्चिमेला असून पुणे तसेच सातारा येथून गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडलेले आहे. तसेच एस. टी. बसेसची ही सोय चांगली आहे.

  पांडवगडाला जाण्यासाठी दोन मार्ग सध्या प्रचलित आहेत. दक्षिणेकडील म्हणजे मेणवली मार्गे असलेला मार्ग खड्या चढाईचा असून दमछाक करणारा आहे. तर उत्तरेकडील मार्ग तुलनेत सोपा आहे. त्यामुळे एकीकडून चढून दुसरीकडे उतरणे सोयीचे पडते.

  वाईमधून मांढरदेवला जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. या मार्गावर धावडी नावाचे गाव आहे. धावडीतून पांडवगडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. धावडी गावाजवळ कोरीव अशा लेणी आहेत. या उपेक्षीत लेणीही पहाण्यासाठी तासाभराचा अवधी पुरेसा आहे. लेणी पाहून आपण पुन्हा धावडी गावात येवून पांडवगडाची चढाई सुरु करतो. तासभर चढाई केल्यावर आपण पांडवगडाच्या कातळमाथ्याच्या पश्चिम अंगाला असलेल्या पठारावर पोहोचतो. या पठारावर एक बंगला आहे. तो खाजगी असून वाडीया नावाच्या माणसाचा आहे. त्याने हा किल्ला सरकारकडून विकत घेतला असल्याचे सांगतो. तो किंवा त्याचे नोकर येणार्‍या किल्लेप्रेमींना दिशाभुल करण्याचा प्रयत्न करतात.

  येथून कातळमाथा उजवीकडे ठेवून आपण पांडवगडाच्या उत्तरअंगाला असलेल्या भग्न दरवाजाने गडामध्ये प्रवेश करतो. वाटेमध्ये पाण्याची दोन टाकी आहेत. गडामध्ये हनुमंताचे मंदिर आहे. मंदिर बांधलेले नसल्यामुळे मुर्ती उघड्यावर आहे. गडावर गडाची देवी पांडवजाईचे मंदिर आहे. गावकर्‍यांचे कुलदैवत असल्यामुळे हा परिसर गावकर्‍यांनी स्वच्छ ठेवलेला आहे. गडाच्या चारही बाजुना नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे गडावर फारशी तटबंदी बांधलेली नाही. गडाचे गडपण दाखविणारी घरांची जोती तसेच कोरडी पडलेली पाण्याची टाकी आढळतात.


  गडावरुन धोम धरणाचा जलाशय सुरेख दिसतो. जलाशयामागे कमलगडाचा माथा उंचावलेला दिसतो. त्यामागे महाबळेश्वराचे तसेच पाचगणीचे पठार ओळखू येते. पांडवगडाच्या माथ्यावरुन खाली वाई तसेच कृष्णा नदी ही दिसते. केंजळगड, मांढरदेव, चंदन वंदन किल्ले तसेच वैराटगड ही पहाता येतो.

  परतीच्या वाटेवर निघाल्यावर आल्यावाटेने न उतरता दक्षिण अंगणाला येवून मेणवलीच्या वाटेने उतरल्यास मेणवलीतील नाना फडणीस यांचा वाडा ही पहाता येतो तसेच मेणवली मधील सुबक बांधणीचा कृष्णा नदीवरील घाटही पाहून येथील पोर्तृगिजांकडून आणलेली घंटाही पहायला मिळते. नाना फडणीस यांच्या वाड्याच्या दारात असलेला एक दुर्मीळ वृक्षही पहायला मिळेल. भलामोठा घेर असलेला हा गोरख चिंचेचा वृक्ष आहे.

  मेणवलीपासून जवळ असलेल्या धोम गावातील नृसिंह मंदिर पाहून आपण पुन्हा वाईला येतो. वाईचा घाट आणि ढोल्या गणपतीचे दर्शन घेवून आपल्या भटकंतीची सांगता करता येईल.

  प्रमोद मांडे

  विदर्भाची काशी मार्कंडेश्वर

              गाडी निघाली... आणि विदर्भाच्या काशी मार्कंडेश्वर विषयी माझ्या मनात विचार सुरु झाले. गडचिरोली जिल्हा हा घनदाट जंगल, दर्‍याखोर्‍या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे येथे अनेक निसर्गरम्य व विलोभनिय नद्यांचे संगम व ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत. यापैकीच एक विदर्भातील काशी म्हणुन ओळखले जाणारे मार्कंडेश्वर हे भाविकांचे तिर्थस्थळ म्हणुन ओळखले जाते. गडचिरोली पासुन ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्याच्या वायव्य दिशेला मार्कंडा देवस्थान आहे.
              उत्तर वाहीनी वैनगंगेच्या काठावर वैभवशाली इतिहासाची साक्ष देत व उत्कृष्ट शिल्पकलेची आठवण करुन देणारे मार्कंडा देवालय आहे. मार्कंडेय ऋषीच्या नावाने ओळखले जाणारे मार्कंडेश्वराचे हेमाडपंथी् मंदिर आज अनेक शतकापासून दिमाखात उभे आहे. मंदिराच्या बाहेरील भागावर कोरलेल्या शिल्प कलाकृती पाहून वेरुळ-अजिंठा व खजुराहो याची आठवण होते. मंदिराच्या गाभार्‍यात ज्योतिर्लिंग असून या ज्योतिर्लिंगाच्या खाली भुयारीवाट असल्याची अख्यायिका आहे. मंदिराच्या सभोवतील परिसरात अनेक लहान मोठ्या मंदिरे असून काही मंदिराचे भग्न अवशेष पाहावयास मिळतात. मंदिराजवळ ज्योतिर्लिंग असून मंदिराला लागुन भुवनेश्वर, गणपती, हनुमान महिषासुर मर्दिनी यासारखी लहान-मोठे मंदिरे आहेत. मुख्य मंदिरापासून उत्तर वाहिनी वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे याठिकाणी बांधण्यात आलेल्या घाटामध्ये भाविकांची स्नान करण्याकरीता गर्दी असते.

              दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्री निमित्त यात्रेला प्रारंभ झाला असून मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्याकरीता विदर्भातुन व अन्य राज्यातुन भाविक येतात. या काळात भाविकांना येथे जाण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणाहून एस.टी. बसेसची सोय राज्य परिवहन महामंडळामार्फत केली असून याबरोबरच स्थानिक प्रशासनाद्वारे भाविकांसाठी विविध सोयी-सुविधां उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

               या मंदिराचा इतिहास बघितला तर सन १८७३-७४ आणि १८७४-७५ मध्ये सेंट्रल प्राव्हिन्सेसच्या रिपोर्ट नुसार या मंदिरास सर्वप्रथम ब्रिटीश इतिहासकार सर कॅनिंगहॅम यांनी भेट दिल्याचे दिसून येते. त्यावेळी त्यांना या ठिकाणी २४ मंदिरे असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. या मंदिराचे बांधकाम दहाव्या शतकात झाल्याचे म्हटले आहे. या २४ मंदिरापैकी आता चारच मंदिरे सुस्थितीत असून २० मंदिरे भग्न अवस्थेत आहेत तर काही लुप्त झाले आहेत.

                सन १९७३ च्या चंद्रपुर गॉझिटिअरमध्ये मार्कंडा मंदिर समुहाने बांधकाम राष्ट्रकुटांनी केल्याचे नमुद आहे. प्रसिध्द इतिहास संशोधक स्व. गिराशी यांच्या मतं आठव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला राष्ट्रकुट सम्राट तिसरा गोविंदा यांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाले असावे. विदर्भात अनेक ठिकाणी त्याचे ताम्रपट सापडले असून त्यातील उल्लेखावरुन त्याची राजधानी मयुराखंडो येथे होती. मार्कंडा किंवा मार्कंडो हे काळाच्या ओघात झालेले मयुराखंडोचे अपभ्रम्य रुप असावे असे मानले जाते. या अतिप्राचिन व सुंदर अशा विदर्भाची काशी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी भेट द्यावी ही इच्छा आज पूर्ण झाली. समोर भव्य मंदीर दिसत होत.

  अरुण सुर्यवंशी